कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर आलेल्या कंटेनरने कराड जवळ दोन दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये एका दुचाकीस्वाराच युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर मुंढे, ता. कराड गावच्या हद्दीत रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
अमित पांडूरंग पाटील (वय २३, रा. सुपने, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अजहर शेख (रा. साकुर्डी, ता. कराड) असे जखमीचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूणहून कराडच्या दिशेने निघालेला कंटेनर रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्यातील मुंढे गावच्या हद्दीत पोहोचला. वास्तविक, या रस्त्यावर विजयनगरपासून मुंढे गावापर्यंत रस्त्याला पुर्णपणे उतार आहे. संबंधित कंटेनर भरधाव वेगात या उताराच्या वळणावरून खाली आला. त्याचवेळी चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरची दुभाजकाला धडक बसली. दुभाजक तोडून कंटेनर कराड-चिपळूण लेनवर घुसला. समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना त्याने चिरडले. ही धडक एवढी भिषण होती की, अमित पाटील या युवकाचा देह अक्षरश: छिन्नविछिन्न झाला. तर अजहर शेख हा युवक गंभीर जखमी झाला. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली.
दरम्यान, कराड शहर वाहतूक शाखा व अपघात विभागाचे पोलीस कर्मचारीही तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून अपघातस्थळाचा पंचनामा केला. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात झाली नव्हती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.