महाविद्यालयातील प्रांगणातच तरुणाची निर्घृण हत्या 

murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

जालना – शहरात एका 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाच्या पटांगणात ही घटना उघडकीस आली आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या प्रकरणी चंदनझीरा पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. तौफिक उर्फ राहील खान असं हत्या झालेल्या 20 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो शहरातील लालबाग परिसरातील रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही स्थानिक नागरिकांना रविवारी सकाळी बारवाले कॉलेजसमोरील पटांगणात मृतदेह आढळून आला होता. नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी त्वरित या घटनेची माहिती चंदनझीरा पोलिसांना दिली. ओळख पटल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी देखील घटनास्थळी गर्दी केली. जोपर्यंत मारेकऱ्याला अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारावर सागर डुकरे नावाच्या संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपी मारेकऱ्याने तीक्ष्ण हत्याराने डोक्यात घाव घालून हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मृत आणि संशयित आरोपी दोघंही गुन्हेगार प्रवृत्तीचे असून विविध पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मृत तरुणाच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सागर डुकरे नावाच्या तरुणाला अटक केली आहे. पैशांच्या वादातून ही हत्या झाली असल्याचा आरोप मृत तरुणाच्या वडिलांनी केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांना घटनास्थळी फुटलेला मोबाइल आणि अन्य काही वस्तू आढळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास चंदनझीरा पोलीस करत आहेत.