हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून चक्क पुण्यातील बड्या बिल्डरला 20 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
सदर आरोपींनी गूगल प्ले स्टोर वरून फेक कॉल ॲप नावाचे ॲप डाऊनलोड केले. याच्या मदतीने त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांकचा वापर करून बांधकाम व्यवसायिकाला फोन केला. बिल्डरकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागून यातील दोन लाख रुपये आरोपींनी घेतले. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिल्यानंतर बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंडगार्डन पोलीस ठाण्यात IPC 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार मागील दहा दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत सुरू होता. नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सौरभ नारायण काकडे, सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे, किरण रामभाऊ काकडे, आकाश शरद निकाळजे, चैतन्य राजेंद्र वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत