मुंबई प्रतिनिधी | देवतारी त्याला कोण मारी अशी म्हण मराठीत रूढ आहे. या म्हणींचे सत्यरुप आज मुंबईमध्ये पाहण्यास मिळाले आहे. डोंगरी भागात म्हाडाची इमारत पडल्याने त्या इमारतीच्या मलम्याखाली ४० लोक दबले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.या मलम्यातून एका बाळाला जिवंत काढले गेल्याची घटना देखील काही वेळा पूर्वी घडली आहे.
जखमी अवस्थेत सापडल्या या बाळाला जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र त्या बाळाचे नाव अद्याप समजू शकले नाही. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाखाली लोकांना बाळ रडत असल्याचा आवाज आला. तेव्हा लोकांनी वेगवान हालचाल करून ढिगारा दूर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाळाला जिवंत वाचवण्यात लोकांना यश आले आहे.
सकाळी साडे अकराच्या सुमारास जोरदार वादळ आल्याचा भास झाला आणि कर्कश्य आवाज कानावर येऊन आदळला.त्यानंतर लोकांचा एकच गलका ऐकू येऊ लागला. इमारत पडली! इमारत पडली!! असे लोक ओरडू लागले, अशी प्रतिक्रिया एका प्रत्यक्षदर्शनी व्यक्तीने माध्यमांशी बोलताना दिली आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १२ लोक या दुर्घटनेत मृत पावले आहेत असे म्हणले आहे. तर या दुर्घटनेतील तीन मृत व्यक्तींना बाहेर काढण्यात आत्तापर्यंत प्रशासनाला यश आले आहे. त्या मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका छोट्या मुलाचा समावेश आहे.