Buldhana Bus Accident : अपघाताची घटना दुर्दैवी; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत- मुख्यमंत्री शिंदे

Buldhana Bus Accident Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावर बुलढाणा मध्ये खासगी बसला आग लागून यामध्ये तब्बल २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत ट्विट करण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत असं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

कसा झाला अपघात?

नागपूरहुन पुण्याला जाणारी खासगी बस रात्री 1 वाजता सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा गावात आधी लोखंडी खांबाला धडकून संरक्षक कठड्यावर आदळली. त्यानंतर उलटून बसने पेट घेतला. अगदी काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलं. यावेळी बसमधील प्रवाशांनी आरडा ओरडा केला. मात्र बस पलटी झाल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्यासाठी मार्गच नव्हता. या आगीत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर चालकासह चारजण या अपघातातून वाचले आहेत. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते.