हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुक जवळ आली असतानाच सोमवारी संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA कायदा लागू करण्यात आला आहे. याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. खरे तर, गेल्या अनेक काळापासून देशात या कायद्याविषयी वाद-विवाद, चर्चा सुरू होती. तर, हा कायदा लवकर लागू करण्यात येईल, असे संकेत केंद्रिय मंत्री अमित शाह यांनीही दिले होते. अखेर आजपासून हा कायदा लागू करण्यात आला आहे.
CAA कायदा लागू झाल्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात येऊन हे लोक शरणार्थी झाले आहेत, त्यांना भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी यांचा समावेश असणार आहे. मुख्य म्हणजे, गेल्या 11 डिसेंबर 2019 रोजी नागरिकता संशोधन विधेयक मंजूर करण्यात आले होते. यामागे उद्देशच हा होता की, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी, ख्रिश्चन या लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यात यावे.
मात्र, या विधेयकात मुस्लिमांचा समावेश करण्यात न आल्यामुळे यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी हा कायदा समानतेच्या तत्त्वाचा उल्लेख करतो, असा आरोप लावण्यात आला होता. तसेच, या कायद्याविरोधात 200 पेक्षा अधिक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून हा कायदाच वादाचा मुद्दा बनला होता. परंतु आता लोकसभा निवडणुका जवळ आल्यानंतर सरकारने हा कायदा लागू केला आहे. ज्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.