हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या जन आशीर्वाद यात्रेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर प्रहार करणारे भाजपनेते तथा कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा आपल्या स्थगित केलेल्या जन आशीर्वाद यात्रेला रत्नागिरीतून सुरुवात केली. यावेळी राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल केला. “माझ्या नादी लागू नका, मी जर बोलायला लागलो तर परवडणार नाही, असा इशारा देत मंत्री राणेंनी पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला.
कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी आपल्या तीन दिवसांच्या जन आशीर्वाद यात्रेला रत्नागिरीतून सुरुवात केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, घरात, पिंजऱ्यात राहून कुणी सत्ता चालवत का? मी जर सगळं बोललो तर परवडणार नाही. केसेस काढू हे काढू. अरे मी एवढाच क्रिमिनिल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? मंत्री, आमदार, नगरसेवक शाखाप्रमुख कसं केलं? पहिली पदं तुम्हीच दिली ना तेव्हा विरोध का केला नाही? असा सवाल राणेंनी यावेळी केला.
मंत्री राणेंनी पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात जे वक्तव्य केले होते. त्याचा पुनरुच्चार यावेळी करायला लावू नका, असा इशारा मंत्री राणेंनी दिला आहे.