औरंगाबाद – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी ‘माझे विद्यापीठ परत द्या’ या मागणीसाठी दिल्ली गेट येथे स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवले होते. याप्रकरणी खासदारांसह 24 पदाधिकाऱ्यांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
औरंगाबादला होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता या विरोधात त्यांनी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी आलेल्या पालक मंत्र्यांना काळ झेंडे दाखवले होते तसेच यावेळी त्यांनी जनतेने देखील पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचे आवाहन केले होते. तसेच पोलिसांनी आम्हाला अडवल्यास आम्ही दिवसभर पालकमंत्र्यांचा पाठलाग करू असा इशाराही खासदार यांनी दिला होता. त्यानुसार दिल्लीगेट येथे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पालक मंत्र्यांना काळ झेंडे दाखवले होते. यावेळी कोरोना नियमांचे मात्र सऱ्हासपणे उल्लंघन झाले होते.
सिटी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मोहसिन अली मजहर अली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नियमावलीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, माजी नगरसेवक नासिर सिद्दिकी, शहराध्यक्ष अब्दुल समीर, शारिक नक्शबंदी, गंगाधर ढगे, अजीम खान, कुणाल खरात, शेख बबलू लिडर, जुबेर खान, शेख निजामोद्दीन यांच्यासह 24 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.




