हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्यावरून राज्य सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर राज्यभरात पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून 30 हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक पावले उचलण्यात आली असून त्यासाठी 30 हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या 87 तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे रजनीश सेठ यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील भाषणाचा अभ्यास पोलिसांकडून सुरु आहे. त्याबाबत कारवाई करण्यासाठी औरंगाबाद सीपी सक्षम आहेत. राज ठाकरेंच्या भाषणावर आजच कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा रजनीश सेठ यांनी दिला
राज्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा रजनीश सेठ यांनी दिला आहे. आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. याशिवाय शहरात व राज्यात शांतता राहावी यासाठी स्थानिक पातळीवर अनेक धर्मगुरू आणि संबंधित समाजातील लोकांच्या बैठकाही झाल्या आहेत. कुठेही परिस्थिती बिघडताना दिसल्यास त्यानुसार कारवाई करू, अशा स्पष्ट सूचना आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.