हॉस्पिटलमध्ये मेडिकलच्या औषध बिलात अफरातफर करून घातला 62 लाखांना गंडा; अखेर ‘असं’ फुटलं बिंग; दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा दाखल

Satara Hospital Fraud News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असलेली दिसत आहे. अशात आता एका दाम्पत्यासह चौघा जणांनी मेडिकलमधील औषधांच्या बिलामध्ये अफरातफर करून तब्बल 62 लाख 77 हजार 542 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार येथील सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलेश भानुदास नाईक उर्फ इग्रसी सॅनटन फर्नाडीस, प्रिया नीलेश नाईक (रा. न्यू सातारा नगर, वाई, जि. सातारा), सर्जिमेड एजन्सीचे मालक रविकिरण विलास पाटील (रा. मंगळवार पेठ, सातारा), अजित रामचंद्र कुलकर्णी (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये नीलेश नाईक हा इन्चार्ज फार्मासिस्ट म्हणून काम करत होता. काम करत असताना त्याला पैशाचा मोह सुटला. त्यातून त्याने सातारा हाॅस्पिटलच्या मेडिकलमध्ये हेल्पर म्हणून काम करणाऱ्या अजित कुलकर्णी याच्या मदतीने सर्जिकल औषधे, इंजेक्शनची वेळोवेळी सर्जिमेड एजन्सीचे मालक रविकिरण पाटील यांच्याकडून खरेदी केली.

त्याची बिले मेडिकलच्या रेकाॅर्डला ज्यादा दराने लावली. मेडिकलमधील सर्जिकल औषधांची तसेच इंजेक्शनची वेळोवेळी ग्राहकांना विक्री करून त्यातून येणाऱ्या रक्कमेचा अपहार करण्यासाठी हाॅस्पिटलमधील संगणकात असलेल्या साॅफ्टवेअरमधील नोंदी डिलीट केल्या. त्यामध्ये वेळोवेळी फेरफार करून काऊंटरला जमा झालेल्या रक्कमेपेक्षा कमी रक्कम त्याची पत्नी प्रिया नाईक हिला दिल्या. रजिस्टरला चुकीच्या नोंदी करत तसेच प्रिया नाईक या हाॅस्पिटलच्या नोकर असतानाही त्यांनी माई हाॅस्पिटलमधून येणारा रोजचा कॅश तसेच इतर हाॅस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथून येणारे असोएिसएट चार्जेस हाॅस्पिटलच्या खात्यावर जमा केले नाही. या चाैघांनी संगनमताने कट रचून तब्बल 62 लाख 66 हजार 542 हजारांचा घोटाळा केला.

याबाबत संशय आल्यानंतर सातारा हाॅस्पिटलचे सीईओ विक्रमसिंह सतीश शिंदे यांनी हाॅस्पिटलचे स्टाॅक ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी हाॅस्पिटलचे स्टाॅक ऑडिट केले. या ऑडिटमध्ये पैशांचा हिशोब जुळून आला नाही. अखेर सीईओ विक्रमसिंह सतीश शिंदे (वय ३९, रा. कूपर काॅलनी समोर, सदर बझार सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनंतर .दांपत्यासह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक चेतन मछले हे अधिक तपास करीत आहेत.