दहिवडी | शेखर गोरे यांना अडचणीत आणण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा खोटा बनाव करणाऱ्या डाॅ. नानासो शिंदे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या नाट्यमय घडामोडीत डॉ. नानासो शिंदे यांनी अपहरण प्रकरणात पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे डॉ. नानासो अण्णा शिंदे (वय- 57), संजय किसन शिंदे (वय- 36) व संतोष किसन शिंदे (वय – 35, सर्व रा. पानवण, ता. माण जि. सातारा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माण तालुक्यातील पानवन येथे डॉ. नानासाहेब शिंदे यांचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता त्यांना दि. 27 फेब्रुवारी रोजी रात्री 8 ते साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान पानपन ते ढाकणी जाणाऱ्या रोडवर डॉ. शिंदे, संजय शिंदे, संतोष शिंदे यांनी आपसात संगनमत करून डॉ. नानासो शिंदे यांच्या अपहरणाचा बनाव केला होता. तसेच त्यांनी स्वतःच्या कार ( क्र. एम.एच 14 डी.ए. 4004) च्या शिटवर डिझेल ओतून पेटवून ती दुसऱ्याने पेटवली असल्याचा खोटा पुरावा तयार केला.
सदरील घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना खरी माहिती देणे कायद्याने बंधनकारक असताना त्यांनी ती देण्याची टाळाटाळ करून खोटी माहिती देवून शेखर भगवान गोरे यांना या प्रकरणात अडकावून त्यांना नुकसान पोहचेल या उद्देशाने अपहरणाचा बनाव केला होता. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि बाजीराव ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. व्ही. डोईफोडे करत आहेत.