बोगस रिडींग पाठविताना रंगेहाथ पकडले, उपसरपंचांकडून महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथे एकाच ठिकाणी बसून बोगस रिडींग पाठविताना एकास रंगेहाथ पकडले. उपसरपंच मोहन पाटील यांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केल्यामुळे महावितरण कडून येणाऱ्या अवाजवी व बोगस बिलाबाबत स्पस्ट पुरावाच सापडला आहे. याबाबतचा व्हिडीओ संपूर्ण राज्यभर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आज सर्वत्र या व्हिडीओची व महावितरणच्या भोगळ कारभाराची चर्चा सुरू होती.

शेतीची सर्व थकीत बिले भरणे शक्य नसल्यामुळे जमेल तेवढी रक्कम गोळा करून शेतकरी भरून वीजपुरवठा चालू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. संबंधित ठेकेदारांच्या बेजबाबदार पणामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. असे प्रकार दिवसाढवळ्या घडत आहे.यास संबंधित अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

याबाबत मोहन पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, महावितरणच्या वतीने शेती पंपांचे रोडिंग घेणारा एक व्यक्ती गावातील एका मंदिरात बसून बोगस रोडिंग पाठवीत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर आम्ही काही ग्रामस्थांना बरोबर घेत त्याठिकाणी गेलो. सदर व्यक्ती मांजर्डे, मोराळे गावातील शेती पंपांची यादी घेऊन एकाच ठिकाणी बसून रिडींग पाठवीत असल्याचे निदर्शनास आले. अगोदर कोरोना अवकाळी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना बोगस रिडींग मुळे वीजबिल आवाच्या सव्वा आली आहेत.आजपर्यंत गावात अनेकांना बिल देण्यात आले नाही. महावितरण कर्मचारी यांच्याकडे यादी आल्यानंतर वीजबिल समजते. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.