नवी दिल्ली । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा जुलै महिन्यात होऊ घातल्या आहेत. मात्र, कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी करत काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या पालकांनी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करावी अशा मागणीची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.
CBSE च्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना आधी झालेल्या विषयांच्या परीक्षांच्या गुणांच्या आधारे सरासरी काढून उर्वरित विषयांचे मूल्यांकन करावे, अशी या पालकांची मागणी आहे. देशभरात करोना संक्रमण वाढत चालले आहे. बारावीच्या परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर हजर राहणार, त्या दरम्यान त्यांना संक्रमणाचा धोका आहे. त्यांच्या आरोग्याचा विचार करून या परीक्षा रद्द कराव्यात असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.
CBSE ने बारावी परीक्षा घेण्यासंदर्भातले नोटिफिकेशन १८ मे रोजी जारी केले आहे. यात सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा येत्या १ ते १५ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आल्याचे म्हटलं आहे. यापैकी सीबीएसई बारावीच्या परीक्षा देशभर होणार आहेत. दरम्यान, CBSE बोर्डाने जारी केलेलं हे नोटिफकेशन रद्द करण्याची मागणी पालकांनी केली आहे. ‘जुलै महिन्यात करोना संक्रमण उच्चांकी असणार आहे, असं AIIMS चा डेटा सांगत असताना नेमके याच महिन्यात सीबीएसई परीक्षांचे आयोजन करत आहे. हे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे,’ असं या याचिकेत म्हटलं आहे.
CBSE देशभरातील १५ हजार परीक्षा केंद्रांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली. आधी तीन हजार परीक्षा केंद्रे होती. सीबीएसई करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणार असली तरी लाखो विद्यार्थ्यांचे आरोग्य परीक्षांमुळे धोक्यात येऊ शकते,’ अशी भीती या याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in