हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेवर अनेक माध्यमातून प्रहार करणारे भाजपचे नेते तथा केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्यावतीने राणेंना झेड सुरक्षा देण्यात आलेली आहे. यापूर्वी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यामुळे राणे यांना आता आठ जवानांचे सुरक्षा कवच असणार आहे.
भाजपमध्ये शिवसेनेचे कट्टर विरोधक म्हणून ओळख प्राप्त झालेल्या केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने राणेंना रत्नागिरीत अटक केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने राणेंच्या सुरक्षेचा आढावा घेत त्याबाबतचा अहवाल मागितला होता. आता राणेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यानुसार त्यांना वाय वरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. आधी राणेंच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे दोन कमांडो होते. आता त्यांची संख्या वाढून आठ झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला होता. यावरून ठाकरेंवर निशाणा साधत राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. यावरून त्यांना अटकही करण्यात आली होती. दरम्यान आता राणेंची केंद्र सरकारच्यावतीने सुरक्षा वाढविण्यात आली असून त्यांना झेड सुरक्षा देण्यात आलेली आहे.