केंद्र सरकारने अल्पसंख्याक मुलांची शिष्यवृत्ती सुरू करावी : झाकीर पठाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मागील अनेक वर्षापासून देशातील अल्पसंख्याक समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे. आर्थिक कारणाने त्यांचे शिक्षण बंद पडू नये म्हणून सुरू असलेली शिष्यवृती केंद्र सरकारने अचानक बंद केली. यामुळे मुस्लिम मुलांच्या शिक्षणावर परिणाम होवू लागला आहे. अल्पसंख्याक समाजातील मुलावर हा अन्याय आहे. तेव्हा सदरचा निर्णय केंद्र शासनाने त्वरित मागे घेवून शिष्यवृत्ती पुन्हा पूर्ववत करावी. अन्यथा काँग्रेसच्यावतीने संपूर्ण देशात या विरोधात मोठे आंदोलन उभे केले जाईल, असे वक्तव्य आज सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जाकिर पठाण यांनी केले.

एकीकडे देश महासता बनू पहात आहे. पंतप्रधान मोदी विश्वगुरु म्हणून मिरवत आहेत. ज्या शिक्षणाच्या जोरावर भारत हा विश्वगुरु होणार आहे. त्या शिक्षण क्षेत्राला आज जाणूनबुजून टार्गेट करण्यात येत आहे. मुस्लिम समाजाला डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असून केंद्राने हा निर्णय मागे घ्यावा. यासाठी राज्यभर निवेदन देण्याचे सत्र सुरु असल्याचे सांगण्यात आले. या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांना आपल्या भावना आम्ही पोहचवत आहोत. त्यांनी केंद्राकडे आमच्या भावना पोहचवाव्यात, अशी आमची मागणी आहे. या आशयाचे निवेदन आज काॅंग्रेस अल्पसंख्याक सेलतर्फे जिल्हाधिकारी सातारा यांना देण्यात आले.

दरम्यान, निवेदनापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर जोरदार घोषणाबाजी करून या निर्णयाचा निषेधही करण्यात आला. याप्रसंगी सातारा जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, नरेश देसाई, युवक काँग्रेसच्या प्राचीताई ताकतोडे, मनिषा पाटील, रजिया शेख, सुषमा राजे घोरपडे, मनोजकुमार तपासे, अशोक उत्तकर, हनिफ मुल्ला, संजय तडाखे, राहुल काढले, फराना सय्यद, आमीना शेख, अरबाज शेख, तानाजी शिंदे आदी कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.