कोल्हापूर प्रतिनिधी |सकलेन मुलाणी
केंद्रात युतीची एकहाती सत्ता आल्यानंतर आता मंत्रीपदाच्या चर्चा रंगायला सुरवात झालीय.एकाच वेळी दोन खासदार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद देण्याची गरज असल्याचे सूचक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यामुळे कोल्हापूरला मंत्री पदाची संधी मिळणार का ? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिलंय.
कोल्हापूरचा खासदार हा शिवसेनेचा व्हावा अशीही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती कित्येक वर्षांनी ही इच्छा या लोकसभा निवडणुकीत पूर्ण झाली आहे कोल्हापूर जिल्ह्याला एक नव्हे तर दोन शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत अखंड कोल्हापूर आता भगवामय झाले. खरतर कोल्हापूरने दहा पैकी सहा आमदार देऊन जिल्हा भगवा केला.मात्र जिल्ह्याच्या वाट्याला सेनेकडून काहीच मिळाले नाही.आता तर दोन खासदार देऊन कोल्हापूरकरांनी सेनेला मोठी ताकद तर दिलीच शिवाय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्नही पूर्ण केले आहे.त्यामुळे याची परतफेड म्हणून उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या पारड्यात मंत्रिपद देणार का हेच पाहणे महत्वाचे आहे.असे झाले तर कोल्हापूरला प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.