हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात. मुंबई उपनगरातून लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो आणि परत जातो. यात सकाळी आणि सायंकाळी मोठी गर्दी मुंबई लोकलच्या स्थानकात पाहायला मिळते. ह्याच गर्दीमुळे अनेकजण फलाट बदल्यावर पटरी ओलांडून जाताना दिसतात तर अनेकजण प्राणघातक स्टंट करताना पाहायला मिळतात. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने ” शून्य मृत्यू ” ही मोहीम हाती घेतली आहे.
7831 लोकांचा झाला मृत्यू
मागील नऊ वर्षात रेल्वे रुल ओलांडत असताना 7831 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लोकल मधून पडून 3485 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. ह्या सर्वच लोकांना आपला जीव लोकलच्या स्थानकात होणाऱ्या गर्दीमुळे गमावावा लागला आहे. ही बाब लक्षात घेत मध्य रेल्वेच्या प्रशासनाने शून्य मृत्यू मोहिमे अंतर्गत मुंबई शहर तसेच उपनगरातील कार्यालयांना आपल्या कामकाजच्या वेळा बदलण्याची विनंती केली त्यानुसार मुंबई शहर व उपनगरातील अनेक कार्यालयानी आपल्या कामकाजाच्या वेळेत बदल करून घेतला आहे.
गेल्या दोन महिन्यांत मध्य रेल्वेने 750 संस्थांशी पत्रव्यवहार केला असून 27 संस्थांनी या मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद दिला असून आपल्या वेळेत बदल केले आहेत. सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने मुंबईतील संस्थांशी पत्रव्यवहार करून, कार्यालयीन वेळा बदलण्याची विनंती केली. त्यानंतर, मुंबई पूर्व-पश्चिम उपनगरातील संस्थांना पत्र लिहण्यास सुरुवात केली. आता ठाणे, नवी मुंबईतील संस्थांना पत्र लिहून मोहिमेची व्याप्ती वाढवली जात आहे. यामुळे लोकल स्थानकावरील तसेच लोकलच्या डब्यातील गर्दी कमी होत असून लोक सहजरीत्या आपला प्रवास करताना दिसून येत आहेत.