हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दी बघून अनेकांना घाम फुटेल. त्यामुळेच मुंबईकरांच्या सेवेत AC लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र एसी लोकलचे तिकीट साधारण लोकलच्या फर्स्ट क्लास तिकिटापेक्षाही अधिक असल्याने सामान्यांना त्याचा फायदा फार होऊ शकलेला नाही. तरी देखील साध्या लोकल गाडय़ांना मोठी गर्दी असल्याने रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले असलेली कुटुंबे खिशाला परवडत नसतानाही गैरसोय टाळण्यासाठी AC लोकलने प्रवास करत आहेत. परंतु आता मध्य रेल्वेने प्रवाशांचा खिसा कापण्यासाठी नवा फंडा अवलंबला आहे.
गाडी स्थानकातून निघून गेल्यास देखील स्थानकात येणार असल्याचे फलक :
मध्य रेल्वेच्या स्थानकातून AC लोकल निघून जात असतानाही फलाटावरील इंडिकेटरवर सदर गाडी पुढील पाच-दहा मिनिटांत येणार असल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे प्रवासी एसी लोकलने प्रवास करण्यासाठी महागडे तिकीट काढून धावतपळत फलाटावर येतात. मात्र फलाटावर भलतीच गाडी येत असल्याने प्रवाशांना नाइलाजास्तव AC चे तिकीट असतानाही साध्या लोकलने दाटीवाटीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मध्य रेल्वेचा AC लोकल थोपवण्याचा प्रयन्त :
हा प्रकार कुर्ला, घाटकोरसह मध्य रेल्वेच्या अन्य स्थानकांवरही घडत आहे. त्यामुळे प्रवासी तिकीट काढून फलाटावर येताता तेव्हा साधी लोकल आल्याने त्यांचा मोठा भ्रमनिरास होत असल्याने त्यांच्याकडून रेल्वेच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. एसी लोकलला मागणी कमी असल्याने मध्य रेल्वेच्या माध्यमातून अश्या प्रकारचे फंडे वापरून मध्य रेल्वे एसी लोकल सामान्यांवर थोपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे.