छ. शिवाजी महाराजांच्या गुणांची जपणूक करणे हाच यशाचा शिवमंत्र : प्रा. डॉ. विनोद‌ बाबर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | मोबाईल सारख्या अभासी दुनियेतून बाहेर येऊन लोकांच्या बरोबर संवाद साधला पाहिजे. छ. शिवाजी महाराजांचे आचार, विचार, कर्तृत्व, नेतृत्व ही जीवनमुल्ये घरघरातील युवकांनी जतन करणे हाच यशाचा होण्याचा शिवमंत्र असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी केले.

यशवंत शिक्षण संस्थेचे गोटे- मुंढे (ता. कराड) येथील प्रितीसंगम विद्यालयात स्व. ए. व्ही. पाटील सर (आण्णा) यांच्या पुण्यतिथी निम्मित ‘यशाचा शिवमंत्र’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष उपप्राचार्य एम. के. मुल्ला, संस्थेचे सचिव डी. ए. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, सोसायटी चेअरमन हणमंत पाटील, उद्योजक रमन पाटील, प्रमोद मोरे, हणमंत चव्हाण, उपसरपंच योगेश जमाले, एॅड. डॉ दिपक माळी, माजी सरपंच महमंद आवटे, मुख्याध्यापक जी. बी. देशमाने, के. आर. साठे, ए. आर. मोरे, डी. पी. पवार, व्ही. एच. कदम, सचिन जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. विनोद बाबर म्हणाले, स्व. ए. व्ही पाटील आण्णानी ग्रामीण भागात यशवंत शिक्षण संस्था उभा करून गरीब होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन उभा केले. हे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. आजचा विद्यार्थ्यांचे जीवन मोबाईल ने हिरावून घेतले आहे. मोबाईलने माणूस माणसात ठेवला नाही. आई- बापासाठी आपली मुलं हीच खरी संपत्ती असते. आपल्या कृत्यामुळे आपल्या आई-वडिलांची मान खाली होणार नाही, असे संस्कारमय जीवन विद्यार्थ्यांनी जगले पाहिजे. सत्याच्या मार्गावर चालताना अनेक अडचणी येतात, त्यावर मात करायला शिकावे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास आज अमेरिकामध्ये शिकवलं जात आहे. तेव्हा छ. शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र एकदातरी वाचा म्हणजे यशाचा शिवमंत्र तुम्हांला मिळेल.

या कार्यक्रमावेळी एसएससीमध्ये संस्थेत प्रथम तीन व 90% पेक्षा जास्त गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, तसेच एन. एम. एम. एस. व पुर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी. बी. देशमाने यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा पानवळ केले. आभार एस .डी. चव्हाण यांनी मानले.