पाटण | पाटण तालुक्यातील चाफळ गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. शिवसेनचे लोकनियुक्त सरंपच सूर्यकांत पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. शिवसेनेकडून या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे देसाई गटाच्या सरपंचाच्या निधनाने पाटणकर गटाचे सदस्य जादा असल्याने बिनविरोध सत्तांतर झाले.
चाफळ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपद रिक्त होते. त्यासाठी पोटनिवडणूक झाली. शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष दत्ताजीराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पाटणचे निवासी नायब तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली निवड झाली. यावेळी विरोधी गट असलेल्या शिवसेनेकडून कोणताही अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष पवार यांचा एकच अर्ज दाखल लोकनियुक्त सरपंच सूर्यकांत पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
चाफळमध्ये राष्ट्रवादीकडे पाच तर शिवसेनेकडे चार सदस्य आहेत. बहुमत राष्ट्रवादीकडे असले तरी शिवसेनेचे स्व. सूर्यकांत पाटील हे चुरशीच्या निवडणुकीत विजयी झाल्याने सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आली होती. त्यामुळेच या सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकीबाबत उत्सुकता होती. नवनियुक्त सरपंच आशिष पवार यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, खासदार श्रीनिवास पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, माजी सभापती राजेश पवार यांच्या सहकार्याने चाफळ गावाचा विकास करणार असल्याची ग्वाही दिली आहे.