मुंबई प्रतिनिधी | दोन महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणुक युतीतच लढणार असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्या पार्ष्वभूमिवर आता जागावाटपावरून दोन्ही पक्षात विचारविनिमय सुरू झाला आहे. समसमान जागा वाटप होईल अशी उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली आहे. तर जागावाटपाबाबत नवे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही बोलू नये असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
जागावाटपावरून भाजप – शिवसेनेत मतभेद असल्याचे दिसून येत आहे. भाजप आणि सेनेच्या नेत्यांकडून काही जागांवर दावा केला जात आहे. तर भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या जागा वाटपावर भाष्य केले आहे. यावरून शिवसेना खा. संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत युतीच्या विधानसभेच्या जागावाटपावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करू नये, असे आवाहन केले आहे.
याबाबत संजय राऊत म्हणाले की, युतीमध्ये जागावाटपाबद्दल कोणताही तिढा बाकी राहिला नाही, शिवसेना-भाजप जुळे भाऊ आहेत. कोणताही वाद नाही. तसेच दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी जागा वाटपाबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी जागावाटपात हस्तक्षेप करू नये असे राऊत म्हणाले.