टीम, HELLO महाराष्ट्र। महाराष्ट्रातील पराभवानंतर नाराज असणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मनातील खदखद गुरुवारी बाहेर पडली. निमित्त होते दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त आयोजित मेळाव्याचे. या मेळाव्यात खडसेंसह मुंडेंनीही पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये असलेली धुसफूस यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे.
या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम उरकून पाटील हे सोलापूरला गेले असता त्यांनी या मेळाव्याबद्दल भाष्य केलं आहे. पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केलेल्यांची गय केली जाणार नाही असा सूचक इशारा एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्षपणे दिला आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावरुन बंड केलेल्यांची उदाहरण सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, पण महाराजांनी बंड मोगलांविरोधात केलं होतं, सावरकरांनी इंग्रजांविरोधात बंड केलं होतं. स्वकीयांविरोधात बंड करायचं नसतं. आपल्या माणसांविरोधात भांडायचं नसतं चर्चा करायची असते. घरातील भांडणं चव्हाट्यावर आणायची नसतात असा सल्लाही पाटील यांनी मुंडे-खडसेंना दिला.
तसेच केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण पक्षात तयार झालं आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया चालणार नाही. काम चांगलं केलं तर बक्षिसही मिळेल पण पक्षाच्या विरोधात केलं तर शिक्षा दिली जाईल असा सूचक इशाराही पाटील यांनी दिला आहे.