हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून शिंदे- भाजप सरकारवर वारंवार आरोप केले जात आहेत. राऊतांच्या आरोपावरून आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे. “संजय राऊत हे सत्तांतरानंतर बावचळून गेले आहेत. त्यामुळे ते सकाळ-दुपार आणि संध्याकाळी माध्यमांशी संवाद साधून शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप करीत आहेत. यामुळेच त्यांच्यावर नागपूर दौरा करण्याची नामुष्की ओढावली आहे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मध्यंतरीच्या सत्तांतरानंतर महाविकास आघाडीमधील नेते बावचळले आहे. कुणाला अपेक्षित नव्हते असेच घडले आहे. त्यामुळे केवळ आरोप करण्याचे काम विरोधकांकडून सुरु आहे.
आता शिंदे सरकारच्या काळात ओबीसी राजकीय आरक्षण, मेट्रो प्रकल्प अशी मोठी कामे मार्गी लागणार आहेत. यामध्ये अडथळा निर्माण होईल असे काहीच नाही. शिवाय विकास कामे होत असतानाच पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत घेतलेला निर्णय हा सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. राज्य सरकारने विकास कामाचा धडाका सुरु केल्याने महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.