विधानसभेला शिंदेंच्या शिवसेनेची 48 जागांवर बोळवण? बावनकुळेंचं विधान अन् नंतर सारवासारव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढणार आहे. मात्र याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रसशेखर बावनकुळे यांच्या एका विधानामुळे भाजप आणि शिवसेना युतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला 240 जागा लढायच्या आहेत असं विधान बावनकुळे यांनी केलं. म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेची अवघ्या 48 जागांवर भाजप बोळवण करणार का? असा प्रश्न निर्माण झाला. मात्र नंतर भाजपने सोशल मीडियावरून बावनकुळे त्यांचा हा व्हिडीओ हटवला आहे.

बावनकुळे नेमकं काय म्हणाले ?

भाजपच्या प्रसिद्धी प्रमुखांची काल बैठक पार पडली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना मार्गदर्शन करताना थेट जागावाटपाचा आकडेच सांगितला. २०२४ मध्ये भाजपचे १५० ते १७० आमदार निवडून येतील. आपण २४० च्या आसपास जागा लढण्याच्या विचारात आहोत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ५० पेक्षा जास्त आमदारच नाहीत. त्यामुळे आपण विधानसभा निवडणुकीत 235-240 जागा लढवल्या तर तेव्हा तुम्हाला खूप काम करावे लागेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. त्यामुळे शिंदे गटाला उरलेल्या ४९ जागांवरच समाधान मानावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित झाला.

बावनकुळे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाला होता. मात्र त्यानंतर सर्व अकाउंट वरून तो विडिओ हटवण्यात आला. दरम्यान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना आणि सज्ज रहावे, यासाठी मी ते वक्तव्य केलं. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जागावाटपाचा कोणताही फॉर्मुला अजून ठरला नाही असं म्हणत बावनकुळे यांनी आपल्या विधानावर सारवासारव केली. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपने केलेल्या निवडणूक तयारीचा उपयोगच होईल असेही त्यांनी सांगितलं.