कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या महाबळेश्वर शहर इंग्रजांच्या काळात वसलेले असल्याने आजही अनेक ठिकाणांना इंग्रज अधिकाऱ्यांचे नांवे आहेत. इंग्रजांची सत्ता जावून आज 75 वर्ष पूर्ण झाली, मात्र त्यांची नांवे हटविलेली नाहीत. याविरोधात हिंदू एकता आंदोलन आणि भारतीय जनता पार्टी सातारा हे आक्रमक झालेले आहेत. इंग्रजी अधिकाऱ्यांची नावे बदलण्याची मागणी आता होवू लागली असून त्याबाबतचे निवेदनही विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे.
हिंदू एकता आंदोलन सातारा जिल्हा व भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा यांच्यातर्फे महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळांना असलेली इंग्रज अधिकाऱ्यांचे नावे बदलून क्रांतीकारांची नावे देण्यात यावी याबाबतचे निवेदन देण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 75 वर्षे उलटून गेलीत तरी महाबळेश्वर तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळे आज देखील इंग्रज अधिकाऱ्यांच्या नावाने ओळखतात. यंदाचे वर्ष स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून गणले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर क्रांतिकारकांच्या या पराक्रमाची दखल घेऊन इंग्रज अधिकारी यांची नावे बदलून महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळांना देशातील शूर क्रांतिकारकांची नावे देण्यात यावी, अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रम पावसकर तसेच महाबळेश्वर तालुक्यातील हिंदू एकता आंदोलन व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
महाबळेश्वर स्वतंत्र झाले का ?
महाबळेश्वर येथील वनविभाग आणि तहसिलदार यांना देण्यात आले. आज 75 वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळून झाले, तरीही महाबळेश्वर येथील पर्यटन स्थळांना इंग्रज अधिकाऱ्यांची नावे आहेत. तेव्हा आजही महाबळेश्वर स्वतंत्र झाले की नाही अशी शंका मनात येते. त्यामुळे आम्ही आता ही नावे बदलून क्रांतीकार, स्वातंत्र्यवीर यांची नावे द्यावीत. त्याचप्रमाणे अफझलखान यांच्या परिसरातील अतिक्रमण काढावे. त्याबाबतचा निर्णय होवूनही अतिक्रमण काढण्यात आले नाही. तेव्हा वरील दोन्ही निर्णयाची अमंलबजावणी करण्याची मागणी केल्याचे विक्रम पावसकर यांनी सांगितले.