औरंगाबाद | दिवसेंदिवस सोशल मीडियावर फसवणुकीचे प्रकार वाढत असताना दिसून येत आहे. याच प्रकारे शहरातील एका भामट्याने फेसबुकवर एका जुन्या मोटर सायकलीचा फोटो टाकून विकण्यासाठी जाहिरात असल्याची जाहिरात केली. जाहिरात पाहून एका तरुणाने भामट्याला संपर्क साधला. व्हॉटसॲपवर दुचाकीचे फोटो व दुचाकी पाठवण्याचे आमिष दाखवून भामट्याने तरुणाकडून 39 हजार 500 रुपये उकळले. हा प्रकार सहा महिन्यापूर्वी घडला मात्र दुचाकी मिळेल या आशेवर तरुणाने तक्रार दिली नव्हती. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मंगळवारी त्याने पोलिसात तक्रार दिली.
पंजाबसिंग देवाकरसिंग (वय 31) रा. न्यू एस टी कॉलनी, सिडको-2 असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. पंजाबसिंगने 22 डिसेंबर रोजी सकाळी सोशल मीडियावर जुनी दुचाकी (एमएच 03 डीबी 7880) विक्रीची जाहिरात पाहिली. सिंगने त्यावरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता वरील व्यक्तीने तात्काळ सिंगच्या व्हाट्सअप वर दुचाकीचे फोटो पाठवले. 21 हजारात दुचाकी खरेदीचा व्यवहार झाला. सिंगचा विश्वास बसल्याचे कळताच आरोपीने दुचाकी पाठवण्यासाठी 3 हजार 150 रुपये पाठवण्यास सांगितले. सिंगने ते पाठवल्यानंतर आणखी 11 हजार 500 रुपये मागितले. ते पैसे न मिळाल्याचे सांगून आरोपीने पुन्हा पैसे मागितले. त्यामुळे आरोपीने दोन वेळेस दोन टप्प्यात एकूण 24 हजार 850 रुपये घेतले.
विविध कारणे सांगून भामट्याने असे एकूण 39 हजार 500 रुपये घेतले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुचाकी किंवा पैसे भेटतील या विश्वासावर पंजाबसिंग दिवाकर सिंग पोलिसात तक्रार नोंदवली नाही. मात्र, अखेर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर पुढील तपास करत आहेत.