Thursday, October 6, 2022

Buy now

नवरा कुठल्यातरी मुलीशी बोलत आहे म्हणून बायकोने रागात मोबाईल फोडला, यानंतर नवऱ्याने उचलले ‘हे’ पाऊल

चेन्नई : वृत्तसंस्था – चेन्नईमध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका परक्या महिलेसोबत बोलल्याच्या रागातून बायकोने नवऱ्याचा मोबाईल फोडला तसेच तिच्यासोबत बोलण्याससुद्धा मनाई केली. त्यामुळे व्यथित झालेल्या नवऱ्याने आत्महत्या केली. तामिळनाडूतील चेन्नईमध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. कृष्णा असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत तरुण मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तामिळनाडूतील सुंगुवरछत्रम येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. एक वर्षापूर्वी कृष्णाचा विवाह त्याच्याच गावात राहणाऱ्या पूजा नावाच्या तरुणीशी झाला होता. लग्नानंतर नवरा नीट बोलत नसल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते.

काय आहे प्रकरण?
या दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर पूजा गावी गेली होती. यानंतर जवळपास सहा महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारी ती सुंगुवरछत्रमलाला आपल्या सासरी आली होती. सहा महिन्यांनी दोघांची भेट झाली, मात्र बायकोशी गप्पा मारायचं सोडून कृष्णा आपल्या मोबाईलवर मेसेज करण्यात गुंग होता. यानंतर पूजा रात्रीचे जेवण बनवायला गेली, तेव्हाही कृष्णा कोणाशी तरी फोनवर बोलत होता. यानंतर घरचे काम आटोपल्यानंतर पूजा त्याच्याशी बोलायला आली, तरी तासभर तो एका महिलेशी फोनवर बोलत होता. यानंतर पूजाने त्या महिलेबद्दल विचारले असता कृष्णाने ती आपली सहकारी असल्याचे तिला सांगितले.

परस्त्रीसोबत अफेअरचा आरोप
यानंतर चिडलेल्या पूजाने तुझे त्या महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत का, असा जाब विचारला. यावरुन त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यानंतर पूजाने आपल्या पतीचा हिसकावून घेतला आणि फोडला. यानंतर पूजाने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले, तर कृष्णाने व्हरांड्यात छताला गळफास लावून आत्महत्या केली. अर्ध्या तासानंतर पूजाने दरवाजा उघडला तेव्हा तिला कृष्णाने गळफास घेतल्याचे आढळून आले. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.