सातारा | दिवाळीनंतर आता जिल्ह्यातील राजकारणात फटाके फुटण्याची वेळ आली असून आता दोन दिवसात मोठी उलथापालथ होणार आहे. कारण सातारा जिल्हा बॅंकेत अर्ज माघारी घेण्यासाठी बुधवारी दि. 10 रोजी मोठ्या राजकीय खेळी होणार आहेत. त्यातच आज सोमवारी सकाळी 9 वाजता भाजपचे खासदार छ. उदयनराजे यांनी फलटणमध्ये जावून महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशी कमराबंद चर्चा केली. या चर्चेमुळे सातारा जिल्हा बॅंकेतील अर्ज माघारीचा दिवस तोंडावर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
खा. छ. उदयनराजे भोसले यांनी लक्ष्मी -विलास या निवासस्थानी श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजीवराजे यांची ”सरोज – व्हीला” या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्रीमंत रामराजे व उदयनराजे यांच्यामध्ये तब्बल दीड तास तर संजीवराजेंशी अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. तेव्हा कमराबंद चर्चा ही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच झाल्याचा अंदाज राजकीय वर्तळातून व्यक्त केला जात आहे.
फलटणमधील या भेटीमुळे छ. उदयनराजे भोसले यांचा जिल्हा बॅंकेतील सर्वसामावेश पॅनेलमधील समावेश होणार की नाही, हे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यावर अवलंबूनच असल्याचे स्पष्ट आहे. तर सर्वसमावेशक पॅनेलमध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व छ. उदयनराजे भोसले यांच्यात मध्यस्थी ही रामराजे नाईक निंबाळकर यानांच करावी लागणार आहे. पुढील दोन दिवसात अर्ज माघारी घेण्यासाठी व पॅनेलमधील उमेदवार निश्चित करताना अनेकांची दमछाक होणार आहे.