छगन भुजबळ, अजित पवार, हसन मुश्रीफ महादेव ॲपचे मेंबर! एका नव्या दाव्याने राजकरणात खळबळ

Chhagan Bhujbal, Ajit Pawar, Hasan Mushrif
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महादेव ॲप प्रकरणासंदर्भात ईडी सातत्याने पाठपुरावा करत आहे. याप्रकरणी अनेक बॉलीवूड कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे. आता महादेव बेटिंग ॲपशी थेट राजकीय नेत्यांचा संबंध असल्याचा दावा ईडीने केला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी या ॲपच्या माध्यमातून करोडो रुपये घेतल्याचा आरोप ईडीने लावला आहे. याविषयीच बोलताना, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहे.

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महादेव ॲपमध्ये भूपेश बघेल अडकले आणि जर ते आता भाजपमध्ये गेले तर त्यांचा हर हर महादेव होईल. परंतु हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर आहेत. तसेच, “ग्रामपंचायत निवडणुका पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत, हे जर घटनाबाह्य राज्यकर्त्यांना माहीत नसेल तर हे अनाड्यांचे सरकार आहे” अशी टीका देखील राऊत यांनी केली आहे.

त्याचबरोबर, “मराठ आरक्षण- ओबीसी हा सगळा विषय अत्यंत नाजूक आणि गंभीर आहे. जातीपातीच्या नावावर हे राज्य फोडण्याचं एक षडयंत्र सुरू आहे. या राज्यात राजकीय अस्थिरता राहावी यासाठी प्रयत्न केला जातो आहे. यामुळे या ठिकाणचे रोजगार, उद्योग हे बाजूच्या राज्यामध्ये जावे यासाठी टाकलेले डाव आहेत. राज्यामध्ये सामाजिक एकता राहावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी शिवसेनेची भूमिका आहे” असे राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, “या लोकांनी पंचायती राज समजून घ्यायला हवे. पण हे अनाडी घोडे उधळलेले आहेत. जे राजकीय पक्ष विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घ्यायला घाबरतात. जे सरकार, जे राजकीय पक्ष मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुका लावत नाहीत ते सांगतात आम्ही ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो. घ्या तुम्ही सिनेट आणि मुंबई महापालिका सह इतर 14 महापालिकांच्या निवडणुका व जिल्हा परिषद निवडणुका घ्या आणि मग सांगा कोण जिंकलं कोण हरलं?” असं आवाहन संजय राऊत यांनी सरकारला केलं आहे.