हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. शिंदे गटासह भाजपमधील आमदारांकडून महाविकास आघाडीतील काही नेते संपर्कात असल्याचे बोलले जात असताना अशात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून महत्वाची मागणी केली आहे. “शासनाने नवीन नाशिकमधील सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. हा आदेश त्वरित रद्द करून कार्यालय पूर्ववत सुरू ठेवून सुमारे 3 लाख सिडकोवासीयांना दिलासा द्यावा,” अशी मागणी भुजबळ यांनी पत्राद्वारे केली आहे.
भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य शासनाने नयकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे 1 नोव्हेंबर 2022 च्या पत्रान्वये नाशिक येथील सिडकोचे कार्यालय बंद करण्याचा होय. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सिडकोने नवीन नाशिक येथे सहा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अंदाजे 25 हजार सदनिका बांधण्यात आल्या आहेत. तसेच याठिकाणी सुमारे 5 हजार वेगवेगळया वापरांचे भूखंड वाटप करण्यात आलेले आहेत.
या ठिकाणी पाच हजार भूखंडांमधील निवासी, तथा व्यापारी आणि वाणिज्य भूखंडांवर बांधलेल्या अपार्टमेंट/ सोसायटी मधील फ्लॅट/रो हाऊस/कार्यालय/ऑफिस/शॉप या वेगळया असून त्यांची संख्या नमूद केलेली नाही. सिडको अधिसूचित क्षेत्रामध्ये अंदाजे 50 हजार मिळकती असून त्यांचेबाबत कोणतेही काम करावयाचे असल्यास त्यासाठी सिडको कार्यालयात नागरीकांना जावे लागते. मात्र, शासनाने सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला असल्याचे भुजबळ यांनी म्हंटले आहे.