हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून याच वरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा राहिलेला नाही हे निवडणुकीच्या कलावरून दिसून येत आहे, असा टोला त्यांनी लगावला तसेच ज्या पक्षाला सोबत घ्यायचे त्याच पक्षाला संपवायचे या भाजपच्या प्रयोगामुळेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मोठा फटका बसल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.
प्रत्येक राज्यात एखाद्या पक्षाला सोबत घ्यायचं आणि त्याच पक्षाला नंतर संपवायचं हा भाजपचा नेहमीचा प्रयोग राहिला आहे. महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेची साथ घेतली. यापूर्वी भाजपला महाराष्ट्रात कोणीही विचारत नव्हतं. त्यांच्या एकदोन जागा यायच्या. आज परिस्थिती पाहतच आहोत. तोच प्रयोग त्यांनी बिहारमध्ये केला. त्याचाच फटका नितीशकुमार यांना बसला आहे, असा दावा भुजबळांनी केला.
यावेळी भुजबळ यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांचं तोंडभरून कौतुक केलं. समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, संपूर्ण भाजपा आणि त्यांचे मंत्री असतानाही तेजस्वी यादव यांनी कडवी टक्कर दिली. वडील तुरुंगात असूनही त्यांनी ज्या पद्धतीने पक्ष पुढे नेला त्यामुळे त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. तेजस्वी यांचं सरकार येवो अगर न येवो पण त्यांचं अभिनंदन करायलाच हवं, असंही ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’