हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गणेशोत्सव आला की सर्वात जास्त चर्चा होते ते लालबागच्या राजाची. याच लालबागच्या राजाच नुकतंच मुखदर्शन पार पडलं. या मुखदर्शनानंतर सोशल मीडियावर राजाचे अनेक फोटो व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या फोटोमुळेच एक नवीन वाद पेटला. लालबागच्या राजाच्या चरणांपाशी छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची प्रतिमा साकारण्यात आल्यामुळे शिवप्रेमींनी ही बाब जास्त मनाला लावली आहे. त्यामुळे याप्रकरणी शिवप्रेमींनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे लालबाग राजा गणपती मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आली आहे. आता या सर्व प्रकरणावर छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
संभाजीराजे यांची प्रतिक्रिया
लालबागच्या राजाच्या चरणापाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्राची प्रतिमा साकारण्यात आल्यामुळे शिवप्रेमींना ही बाब सर्वात जास्त खटकली आहे. त्यामुळे या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात हा वाद पेटल्यामुळे संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, “हे प्रकरण आज सकाळीच माझ्यावर कानावर आलं आहे. इतक्या मोठ्या गणपती मंडळाने असे बारकावे नेहमी पाहणे गरजेचे आहे.”
त्याचबरोबर, “लालबागच्या राजाच्या मंडळाने अशी कुठलीही गोष्ट करू नये ज्यामुळे सर्वांच्या भावना दुखावल्या जातील. तसेच जर मंडळाने दुरूस्ती केली असेल तर हा विषय संपवुया असं मला वाटतं” असे आवाहन संभाजीराजे यांनी शिवप्रेमींना केले आहे. आता संभाजीराजे यांनी केलेल्या आवाहनानंतर तरी हा वाद मिटेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मंडळात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आहे. या गर्दीमध्ये कोणताही गोंधळ उडू नये किंवा इतर काही घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त राबवला जात आहे.