रायपूर । देशातील विविध राज्य सरकारांनी कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर तळीरामांची गर्दी दिसून आली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी तर या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. दारूच्या दुकानांवर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगढ सरकानं राज्यातील ग्रीन झोनमध्ये मद्यविक्रीच्या होम डिलिव्हरीसाठी एक वेब पोर्टल लॉन्च केलं आहे.
लॉकडाउनदरम्यान मद्यविक्रीच्या दुकांनावर मोठी गर्दी होऊ नये यासाठी छत्तीसगढ सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. मंगळवारी सरकारकडून याबाबत माहिती देण्यात आली. हे पोर्टल राज्य छत्तीसगढ सरकारद्वारेच चालवलं जाणार आहे. तसंच याचं छत्तीसगढ स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नावावरच ठेवण्यात आलं आहे. ही कंपनी राज्यातील मद्यविक्रीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते.
केंद्र सरकारकडून लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यानंतर राज्यांमध्ये सोमवारपासून मद्यविक्रीला सुरूवात झाली. परंतु यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवण्यात येत नसल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसून आलं होतं. तर दुकानांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. छत्तीसगढची राजधानी रायपुरमध्येही तसंच अन्य जिल्ह्यांमध्येही हेच चित्र होतं. ही गर्दी कमी व्हावी या उद्देशानं सरकारनं मद्याची होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
अशी करता येईल दारू ऑर्डर
छत्तीसगढ राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलेल्या CSMCL च्या वेबसाईट वरून किंवा कंपनीच्या अपवरून ग्राहकांना आपली ऑर्डर देता येईल. परंतु होम डिलिव्हरी केवळ ग्रीन झोनमध्येच करण्यात येईल. रायपुर आणि कोरबा परिसरात ही सुविधा उपलब्ध नसेल,” असं राज्याच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं. ग्राहकांना ऑनलाइन ऑर्डरसाठी आपला मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि पत्ता रजिस्टर करावा लाहमार आहे. त्यानंतर ओटीपीद्वारे व्हॅलिडेशन करण्यात येईल. त्यानंतर एका व्यक्तीला ५ हजार मिलिलीटरपर्यंत ऑर्डर करता येईल. यासाठी १२० रुपये डिलिव्हरी चार्ज द्यावा लागणार असल्याचंही सांगण्यात आलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”