हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटून उठला आहे. गेल्या 17 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील आपले उपोषण मागे घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या भेटीनंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील तोडगा निघेल असे म्हणले जात आहे. यामुळेच आजची मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे यांच्यातील भेट अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
आता थोड्याच वेळात एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावेळी स्वतः एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इतकेच नव्हे तर, आजच्या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघावा अशी आशा सर्वजण व्यक्त करत आहेत. आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत रावसाहेब दानवे, राजेश टोपे, गिरीश महाजन देखील मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जालन्यात दाखल झाले आहेत. त्यामुळेच सर्वांचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकार पुढे पाच प्रमुख अटी ठेवल्या होत्या. यातील एक प्रमुख अट अशी होती की, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच, मनोज जरांगे यांनी असे ही म्हणले होते की, उपोषण सोडत्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण शिष्टमंडळ आंदोलनास्थळी स्थळे हजर असावे. आता मनोज जरांगे यांनी सरकार पुढे ठेवलेल्या अटींसंदर्भात चर्चा करण्यासाठीच एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत.
गेल्या 17 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. या आंदोलनात, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. या मागणीवर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदे चर्चेसाठी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. परंतु यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही नाहीयेत. परंतु एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे उपोषण मागे घेतील असे म्हटले जात आहे.