Monday, February 6, 2023

मुख्यमंत्री ठाकरे मराठा समाजाचा एप्रिल फुल करू नका : आशिष शेलार यांचा हल्लाबोल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल राज्यपालांना दिलेल्या पत्रावरून भाजपचे खासदार नारायण राणे, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या टीकेनंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे व आघाडी सरकारकडून केल्या जात असलेल्या मराठा आरक्षणाबाबतच्या कारभारावरून हल्लाबोल केला आहे.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “या महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही हास्यास्पद सुरु आहे. या आघाडीमध्ये एक सुसूत्रता नसल्याचे दिसून येते. या राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे महत्वाचे मुद्दे सर्वोच्च न्यायालयासमोर मांडले आहेत. ते नीट विचारपूर्वक करून मांडलेले नाहीत. आता थेट राज्यपाल कोश्यारी यांनाच आरक्षणप्रश्नी राष्ट्रपतींना लिहिलेले पत्र दिले आहे. या आघाडी सरकारकडून मराठा समाजाची एक प्रकारची दिशाभूल करण्याचं काम केलं जातंय. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला एप्रिल फुल करू नये,” असे शेलार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

यावेळी शेलार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोपही केले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या समाजाची बाजू राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात खंबीरपणे मांडणे गरजेचे होती. मात्र, त्यांनी तसे केले नाही. हे सरकार आपली बाजू मांडण्यात कमी पडले. या सरकारने राज्यपालांना पत्र देण्याअगोदर तज्ञांच्या समितीची मते समजून घेणे आवश्यक होते. मात्र, तसेही या सरकारने केले नाही. हे आघाडी सरकार एकप्रकारे मराठा समाजाची फसवणूकच करत असल्याचीही टीका यावेळी शेलार यांनी केली आहे.