कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज साताऱ्यात पाहणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते पुण्याहून कोयनानगरकडे रवाना झाले होते. दरम्यान हवामानात बिघाड झाल्याने त्यांचा दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचे हेलिकॉप्टर साताऱ्याहून पुण्याला माघारी गेले आहे. दरम्यान, ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असून, मौजे आंबेघर आणि मौजे मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दरडग्रस्तांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी ते कोयनानगरला येणार होते.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/979050366191118/
याच बरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आज पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, जावळी, वाई तालुक्यात दरडी, मातीचे ढिगारे कोसळणे व महापुर असे संकट ओढवलेले आहे. त्या ठिकाणीही झालेल्या मोठ्या प्रमाणातील नुकसानीचा आढावा घेतला जाणार होता. कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट देणार होते. आणि पूरग्रस्तांची विचारपूस करून दुपारी कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेणार होते.