Monday, January 30, 2023

सोमवारपासून सुरु होणार बच्चे कंपनीची ‘किलबिलाट’

- Advertisement -

औरंगाबाद – कोरोना संसर्ग वाढताच बंद केलेल्या शाळा पुन्हा हळूहळू सुरू होत आहेत. पहिल्या टप्प्यात दहावी, बारावी, दुसऱ्या टप्प्यात आठवी, नववी, अकरावी तर तिसऱ्या टप्प्यात पाचवी ते सातवीचे वर्ग सुरळीत सुरू झाल्यानंतर सोमवारपासून महापालिकेसह खासगी शाळांमधील बालवाडी ते चौथीचे वर्ग व खासगी कोचिंग क्लासेसला अटी-शर्तींच्या अधीन राहून भरविण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली. यामुळे प्राथमिक शाळांमध्‍ये गेल्‍या दोन वर्षांपासून बंद असलेला किलबिलाट पुन्‍हा एकदा ऐकण्यास मिळणार आहे.

प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, शाळा व्यवस्थापक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व इतरांसोबत झालेल्या चर्चेनुसार व मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका हद्दीतील बालवाडी ते चौथीचे प्रत्यक्ष वर्ग व कोचिंग क्लासेस सोमवारपासून अटी व शर्तींच्या अधीन राहून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीचा पर्याय निवडला आहे त्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने शिक्षण देण्यात यावे. प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खासगी वाहनचालक, कंडक्टर, रिक्षाचालक यांनी लसीचे दोन्हीही डोस घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार शाळेत टप्प्या-टप्प्याने तसेच एक दिवस आड बोलवण्यात यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पहिलीपासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

- Advertisement -

शाळा सुरू करण्यापूर्वी ४८ तासांपूर्वीची सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांनी कोरोनामुक्त झाल्यावरच शाळेत उपस्थित राहावे, असे आदेशात म्हटले आहे.