पाटण प्रतिनिधी । सकलेण मुलाणी
पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील नेहरू स्मृती उद्यानात आज बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी शिवसेनेचे नेते तथा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. “भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. त्यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या निसर्गरम्य असणाऱ्या कोयना परिसरातील या वैभवाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून जगाच्या पातळीवर पोहचविण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे गृहराज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.
कोयनानगर येथे आज नेहरू स्मृती उद्यानात बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोयनानगर येथील नेहरू उद्यानातील पंडित नेहरू यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच पूजन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी बालदिन कार्यक्रमाचे उदघाटन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पंचशील ही लाख मोलाची देणगी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जगाला दिली.
धरण परिसर हा तीर्थक्षेत्र असल्याचा गौरवोद्गार पंडित नेहरू यांनी काढले होते. कोविड संसर्गामुळे दोन वर्षापासून बहरलेले कोयनेचे पर्यटन ठप्प आहे. त्यात पावसाळ्यात कोयना विभागात झालेल्या भूसल्खनामुळे याला गालबोट लागले आहे. मात्र, आता कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. या ठिकाणी असलेल्या निसर्गरम्य वातावरणामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी भेटी देतात.
महाविकास आघाडीचे सरकार सध्या आहे. या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोयनानगर या ठिकाणी व परिसरातील या वैभवाला जगाच्या पातळीवर पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येथील निर्सगाची अनेकांना भुरळ पडत आहे. या ठिकाणी अनेक उत्तम दर्जाच्या सुविधा उभारणार असल्याचे यावेळी गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले.