सोलापूर | गेले तीन महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला टेंभुर्णी पोलिसांनी राहत्या घरी छापा टाकून अटक केली. तसेच त्यास घेऊन पोलिस इंदापूरकडे येत होते. त्यांचा ताफा माळवाडी नं-१ च्या हद्दीत इंदापूर-शिरसोडी रोडवर रायकर वस्तीजवळ आल्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिस पथकाच्या कारवर सिनेस्टाईल हल्ला केल्याची घटना घडली.या घटनेत पोलिस कार पलटी होवून सपोनि भोसले व दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. मात्र तरीही धैर्याने टेंभुर्णी व इंदापूर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.
दत्तू नारायण सावंत, रोहन दत्तू सावंत, अमोल दत्तू सावंत, ऊर्मिला दत्तू सावंत, शर्मिला दत्तू सावंत व सुरेखा दत्तू सावंत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जखमीमध्ये टेंभुर्णीचे पोलिस उपनिरीक्षक सुशील भोसले, पोलिस कर्मचारी योगेश चितळे व अक्षय सरडे यांचा समावेश आहे. आरोपी अमोल सावंत हा टेंभुर्णी पोलिसांना एका दरोड्याच्या गुन्ह्यात तीन महिन्यांपासून हवा होता. पोलिसांना तो इंदापूर तालुक्यातील सुगाव येथे असल्याची माहिती मिळाल्याने पो.नि. राजकुमार केंद्रे यांच्या आदेशाने आरोपीस अटक करण्यासाठी पोलिस पथक इंदापूर येथे गेले होते. तसेच मदतीसाठी इंदापूर पोलिसांचे पथकही घेतले होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, टेंभुर्णी पोलिसांनी अमोल सावंत यास राहत्या घरी छापा टाकून अटक केली. तसेच त्यास घेऊन पोलिस इंदापूरकडे येत होते. त्यांचा ताफा माळवाडी नं-१ च्या हद्दीत इंदापूर-शिरसोडी रोडवर रायकर वस्तीजवळ आल्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांच्या कारने पोलिस पथकाच्या कारला पाठीमागून सिनेस्टाईल चार-पाच वेळा जोरदार धडका दिल्या. यात पोलिस कार पलटी झाली. यामध्ये सपोनि भोसले व दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. या दरम्यान आरोपी अमोल सावंत याने फिर्यादी पो.कॉ. योगेश चितळे यास उजव्या बरगडीत मारून जखमी केले. तर सपोनि भोसले यांना आरोपीच्या नातेवाईकांनी छातीत मारहाण केली.
यावेळी आरोपीच्या वडिलांनी गाडी चालक मुलगा रोहन सावंत यास गाडी जोरात चालवून पोलिसांना मारण्यास सांगितले. या दरम्यान आरोपींच्या गाडीची एअरबॅग उघडल्याने गाडी बंद पडली. त्यामुळे पोलिस बचावले. त्यानंतर मोठी झटापट होऊनही धैर्य दाखवत टेंभुर्णी व इंदापूर पोलिसांनी सर्व आरोपींना शिताफीने अटक केली. त्यांच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. टेंभुर्णी पोलिसांनी मुख्य आरोपी अमोल सावंत यास मंगळवारी माढा कोर्टात दाखल केले असता त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेत पोलिसांच्या खासगी वाहनाचे दोन लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.