महालसीकरण अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे – सुनील चव्हाण

Sunil chavhan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  कोविड आजाराला अटकाव करण्यासाठी आवश्यक लस सिल्लोड, सोयगाव तालुक्यात 02, 03 सप्टेंबर रोजी महालसीकरण अभियानात देण्यात येणार आहे. तरी या परिसरातील नागरिकांनी अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून आणि बजाज उद्योग समुहाच्या सहकार्यातून सिल्लोड, सोयगावात महालसीकरण अभियानात राबविण्यात येत आहे. बजाज उद्योग समुहाने सामाजिक उत्तरदायित्व जबाबदारीतून राज्यात सहा लक्ष लस राज्य शासनास उपलब्ध करून दिल्या आहेत. या लस सोयगाव, सिल्लोड तालुक्यातील विविध लसीकरण केंद्रांवर मोफत स्वरूपात देण्यात येणार आहेत. अद्याप एकाही लसचा डोस घेतला नाही, असे अठरा वर्षांवरील नागरिक यांनी लस घेण्यासाठी पुढे यावे. लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या कोविन ॲपवर नोंदणी करावी. लसीकरण केंद्रांवरही ऑन द स्पॉट नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्ड उपलब्ध नाही, अशा नागरिकांसाठी देखील विशेष लसीकरण केंद्रांची व्यवस्था प्रशासनातर्फे केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.सोयगाव, सिल्लोड तालुक्यातील नागरिकांना लसीकरणाचा मोठ्याप्रमाणात लाभ व्हावा, या दृष्टीकोनातून लसीकरण केंद्रेही भरपूर प्रमाणात तयार करण्यात आलेली आहेत. आरोग्य यंत्रणेसोबत बैठक घेऊन याबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. खासगी वैद्यकीय व्यावसाय‍िकांनी लसीकरणास सकारात्मक प्रतिसाद देऊन लसीकरण मोठ्याप्रमाणात करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे

लसीकरण केंद्रांवर मनुष्यबळाची कमतरता भासू नये, याचा प्रशासनाने सर्वतोपरी विचार केला आहे. गरज भासल्यास औरंगाबाद शहरातील नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचीही लसीकरण अभियानात मदत घेण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये, सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे, यासाठी पोलिस विभागांना आवश्यक त्या सूचनाही दिल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले. लसीकरण अभियानाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, सामाजिक बांधिलकी म्हणून रोटरी, लॉयन्स, धर्मादाय संस्था, स्वयंसेवी संस्था आदींनी लसीकरण केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांसाठी पुढाकार घ्यावा, महालसीकरण अभियान यशस्वी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.