मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्र लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला आहे. लोक 100 किंवा 150 कोटींचा दावा दाखल करतात. परंतु ज्याची लायकी जेवढी तेवढाच दावा करावा. त्यामुळे मी चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे. याच दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सामनात अग्रलेख आला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पत्र लिहित उत्तर दिलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला जे पत्र लिहिलं होतं; ते सामनाच्या संपादकीयमध्ये जसेच्या तसे छापण्यात आलं आहे.
आता संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना राजकीय संघर्ष चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्यावरुनही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती का रखडवली हे भाजपनं सांगावं. आम्हाला कायदा- सुव्यवस्था शिकवू नका, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.