राडा! अजितदादा, फडणवीसांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते भामा आसखेड (Bhama Askhed Project) योजनेचे उद्घाटन झालं. या कार्यक्रमादरम्यान सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने उभे ठाकले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी व हुल्लडबाजी करण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, या गोंधळावर कार्यक्रमाला उपस्थित कोणत्याही प्रमुख नेत्याने भाष्य केले नाही. (Pune NCP vs BJP Clash News Update )

भामा आसखेड पाणी प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. बऱ्याच कालावधीनंतर हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने तिथे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. अजित पवार व फडणवीस यांच्यात गेल्या नोव्हेंबर महिन्यात सत्तेसाठी झालेली औटघटकेची मैत्री हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्यामुळेच हे दोन नेते आज काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, प्रत्यक्षात या दोन नेत्यांची भाषणं दूरच राहिली आणि कार्यकर्त्यांच्या गोंधळानेच कार्यक्रम चर्चेत आला. करोनामुळे नियमांचे बंधन असले तरी या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली. सभागृहाबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यातूनच गोंधळाला सुरुवात झाली.

भामा आसखेड पाणी प्रकल्पाचं श्रेय घेण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ‘एकच वादा अजित दादा’ विरुद्ध ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’, अशा घोषणा देत कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. यात काही प्रमाणात हुल्लडबाजीही पाहायला मिळाली. या प्रकल्पाचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात झाले असताना आता काही जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आम्ही विरोध करत आहोत, असे
भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला. या प्रकल्पाचं श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळायला हवं. हा प्रकल्प उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच पूर्णत्वास आला आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. विरोधी पक्षनेते फडणवीस येथे आले असताना भाजपचे कार्यकर्ते गिरीश बापटांच्या नावाने घोषणा देत आहेत. त्यावरून ही घोषणाबाजी भाजपातीलच गटबाजीचे दर्शन घडवणारी होती, असेही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले.दरम्यान, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या कोणत्याच प्रमुख नेत्याने या गोंधळावर भाष्य केलं नाही. माध्यमांना टाळत हे सर्वजण कार्यक्रम आटोपल्यानंतर निघाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment