औरंगाबाद – शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अस्तित्व कुमार पांडेय यांनी इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे सर्व वर्ग बंद करण्याचा आदेश काल जारी केले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी सुरू असलेल्या अभ्यासिका देखील बंद करण्यात आल्या.
रविवारी शहरात 181 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर काल ही संख्या अडीचशेच्या वर गेली. 31 डिसेंबर ते 9 जानेवारी पर्यंत रुग्ण संख्या कशा प्रकारे वाढत गेली याचा अभ्यास करून प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी डिसेंबर महिन्यात शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे सर्व वर्ग बंद करण्यात येत आहेत. महापालिका आणि खासगी शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण यापुढेही सुरू ठेवतील. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग यापूर्वीच म्हणजे 6 जानेवारीपासून बंद करण्यात आले आहेत. प्रशासकांनी खाजगी कोचिंग क्लासेस संदर्भात स्वतंत्र आदेश काढला. यामध्ये शहरातील सर्व कोचिंग क्लासेस आणि अभ्यासिका बंद करण्यात येत आहेत.
शहरातील काही संस्थाचालक इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावत असल्याची माहिती सोमवारी प्रशासकांना प्राप्त झाली. त्यांनी त्वरित शिक्षणाधिकारी यांना बोलावून शाळा तपासणीचे आदेश दिले. नियमबाह्य एखादी शाळा सुरू असल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेशही दिले.