औरंगाबादेत आजपासून आठवी, नववी व अकरावीचे वर्ग सुरू; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोरोना संसर्ग वाढताच बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा हळूहळू सुरू होत आहेत. मनपा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी दहावी, बारावीचे वर्ग भरविण्यास परवानगी दिली होती. आता मनपा हद्दीतील शासकीयसह खासगी शाळांमधील आठवी, नववी व अकरावीचे वर्ग अटी-शर्थीच्या अधीन राहून आजपासून भरविण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने रविवारी शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी केली होती.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, अवघ्या काही दिवसांतच ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या व इतर व्यवहार सुरूच ठेवण्यात आले. त्यामुळे पालकांमधून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. दरम्यान महापालिका प्रशासकांनी 10 व 12 वीचे वर्ग प्रत्यक्षात भरविण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर आता आठवी, नववी व 11 वीचे वर्ग भरविण्यास सोमवारपासून परवानगी दिली आहे. त्यानुसार रविवारी शाळांना सुटी असूनही शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळेची साफसफाई, सॅनिटायझेशनचे कामे सुरू होती.

मनपा प्रशासनाने शाळा व्यवस्थापक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व इतरांसोबत झालेल्या चर्चेनुसार महापालिका हद्दीतील फक्त इयत्ता आठवी, नववी व अकरावीचे प्रत्यक्ष वर्ग सोमवारपासून अटी व शर्थीच्या अधीन राहून सुरू करण्यास मान्यता दिली. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीचा पर्याय निवडला आहे, त्या विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीने शिक्षण देण्यात यावे. प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खासगी वाहनचालक, कंडक्टर, रिक्षाचालक यांनी लसीचे दोन्हीही डोस घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार शाळेत टप्प्या-टप्प्याने तसेच एक दिवस आड बोलविण्यात यावे, असे म्हटले आहे.

Leave a Comment