Mumbai Rain News : गरज असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पावसाची (Mumbai Rain) जोरदार बॅटिंग सुरू आहे. काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईतील विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन यामुळे विस्कळीत झालं असून रेल्वे वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. मुंबईत सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत असून बाहेर पडणे मुश्किल झाल आहे. या एकूण सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करत मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलं आहे. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडा असं एकनाथ शिंदेनी म्हंटल आहे.

याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हंटल कि, मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मी करत आहे.

शाळा- कॉलेजला सुट्ट्या जाहीर –

मुंबईत आजही धुव्वाधार पावसाची शक्यता असून त्याच पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत जे नोकरी करतात त्या नोकरदारांना सुद्धा घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

रेल्वेसेवा विस्कळीत –

पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई लोकल रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. मध्य रेल्वे मार्गावर अनेक लोकल तसेच एक्स्प्रेस ट्रेनस्ही रुळांवर अडकून पडल्या आहेत. भांडुप रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.कोल्हापूर ते मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस तब्बल दीड तासांपासून रेल्वे रुळावर आहे. पुण्याकडे अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द केल्याची माहिती आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र जोपर्यंत पावसाचा जोर कमी होत नाही तोपर्यंत मुंबईतील एकूण परिस्थिती अशीच सुरु राहण्याची शक्यता आहे.