दहीहंडीला खेळाचा दर्जा, गोविंदांना सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच गोविदांना नोकरीत आरक्षण, तसेच गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य आणि जखमीस 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

गोविंदांना यापुढे 5 टक्के कोट्यातून सरकारी नोकऱ्या देण्यात येतील. इतर खेळाप्रमाणे राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा होणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुटीही जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, दहीहंडी उत्सवात दुर्दैवानं गोविंदांचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये, दहीहंडीच्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा कोणतेही दोन अवयव निकामी झाल्यास 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.