हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाख रुपयात घरे देण्यात येतील अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कमीत कमी किमतीत घरे उपलब्ध करून देऊ अशी माहिती दिली होती. अखेर आज एकनाथ शिंदे यांनी थेट घोषणा करत घरे विकत घेण्याचा आकडाच जाहीर केला.
विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, माविआ सरकारमधील जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात काही महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यात आणखी काही चांगले निर्णय घेता येतील का हेदेखील आम्ही पाहत आहोत. खरं तर पोलिसाना 50 लाख किंवा 25 लाखात घरे घेणं परवडणार नाही त्यामुळे आता 15 लाख रुपयात पोलिसांना ही घरे मिळतील अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली.
दरम्यान, आज विधानसभेत औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचे ठरावही एकमुखाने संमत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा ठराव विधानसभेत मांडला. त्यानुसार औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे.