हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आषाडी एकादशी निमित्ताने महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईची महापूजा करण्यात आली. रविवारी पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. यावेळी हे वर्ष सर्वांना सुखाचं, आनंदचं समृद्धीचं जावो अस साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला घातलं.
या पुजेनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हंटल की, आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. माझ्या आईवडिलांच्या पुण्याईने मला हा मान मिळाला. राज्यातील शेतकरी, वारकरी, कष्टकरी, समाजातील सर्व घटकांना सुखाचं आनंदाचं समृद्धीचं जावो. राज्यावरील संकटं, सगळ्या अडचणी दूर होवो. बळीराजा, कष्टकरी, समाजातील प्रत्येक घटकांना सुख समृद्धी मिळो. कृषी, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात राज्याला चांगलं यश मिळो असे साकडे त्यांनी घातले.
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा. pic.twitter.com/0E0R0geU9k
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 10, 2022
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेवराई च्या नवले दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शासकीय महापूजा केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे सपत्नीक उपस्थित होते. शिवाय मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अन्य विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.