शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण पक्षप्रमुख उल्लेख टाळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवस असून देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख मात्र टाळला आहे त्यामुळे पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हंटल की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना…. मात्र यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री असा केल्याने पुन्हा एकदा चर्चाना उधाण आलं आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यापासून राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे याना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. शिंदे गटाने भाजपसोबत सत्तास्थापन करत एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. हे राजकारण एवढ्या वरच थांबले नाही. आमदारांपाठोपाठ खासदारही शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे मोठ्या कोंडीत सापडले आहेत आमचा गट हीच खरी शिवसेना असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून केला जात आहे. सध्या दोन्ही गटांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले असून कोर्टात यावर सुनावणी सुरु आहे.