मुंबई । महाराष्ट्रावरील ‘निसर्ग’ चक्रीवादळाचे संकट टळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हवामान खात्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या वाटचालीविषयी अचूक अंदाज दिल्यानं उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरध्वनी करुन त्यांचे अभिनंदन केले. हवामान खात्याने योग्य अंदाज वर्तवल्याने राज्य सरकारला चांगली तयारी करता आली, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे बुधवारी निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकले होते. सुरुवातीला अलिबाग आणि नंतर मुंबईकडे सरकत असलेल्या या चक्रीवादळाचे क्षणाक्षणाचे अपडेटस हवामान खात्याच्या संकेतस्थळावर जाहीर केले जात होते. यामुळे प्रशासनासोबतच नागरिकांना पूर्वतयारी करण्यासाठी वेळ मिळाला होता. त्यामुळे एरवी चेष्टेचा विषय असणाऱ्या हवामान खात्याचे अनेकांनी कौतुक केले होते.
दरम्यान, या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या महाराष्ट्रातील वाटचालीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला. मान्सून कारवारपर्यंत दाखल झालाय. चक्रीवादळाचा जास्त परिणाम त्याच्या वाटचालीवर झालेला नाही. तो उत्तरेकडं सरकत आहे. २-३ दिवसांत मान्सून तळकोकणाकडे वाटचाल करेल, असे होसाळीकर यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”